इंफाळ: मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 प्रादेशिक लष्कर(टेरिटोरियल आर्मी) छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या घटनेत शुक्रवारी आणखी 9 मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 47 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, 18 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री बचावकार्य थांबवण्यात आल्यानंतर आज सकाळी पुन्हा बचाव पथकाने घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलनाच्या घटनेत आतापर्यंत 14 जवान, दोन मजूर आणि एका अज्ञात व्यक्तीसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभर पडलेल्या पावसामुळे भूस्खलनाची ही घटना घडली. मणिपूरचे डीजीपी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, या घटनेतील इतर मृतांचा शोध सुरू आहे. ढिगाऱ्याखाली किती लोक दबले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
भूस्खलनाची घटना बुधवारी रात्री उशिरा आणि गुरुवारी पहाटे घडली. जिरीबाम ते इंफाळपर्यंत रेल्वे मार्ग बांधणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी 107 प्रादेशिक सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. दरड कोसळण्याच्या घटनेनंतर रेल्वे, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल बचाव कार्यात गुंतले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, अपघाताच्या वेळी प्रादेशिक सैन्याचे 43 सैनिक तेथे उपस्थित होते.