मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:44 AM2023-08-12T05:44:00+5:302023-08-12T05:44:14+5:30
राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी संसदेत हसणे आणि विनोद करणे शोभणारे नाही.
काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारच्या हातात अशी साधने आहेत, जेणेकरून हिंसाचार थांबविता येईल. तिथे महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड आणि अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून हसत आहेत.
ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे वक्तव्य पोकळ नव्हते. मी पंतप्रधानांना संसदेत २ तास बोलत, हसत, मस्करी करताना पाहिले. माझा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की, जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवायला सांगितले तर तो लगेच थांबेल.
राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे?
मणिपूरच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे? युवतींवरील अत्याचाराची बाब संसदेत ऐकवावी? तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे व्हिडीओ टेप होता, तर त्यांनी तो तपास यंत्रणांना का दिला नाही?, असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तो व्हिडीओ त्यांच्याकडे आधीच होता तर तो दाबून का ठेवला? तो तपास यंत्रणांकडे का दिला नाही? गिरिराज सिंह म्हणाले, खरे तर राहुल गांधी व काँग्रेसला मणिपूरमध्ये दोन मणिपूर करायचे आहेत. त्यांच्या मनात चोर आहे.