Loksabha Election : देशभरात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. देशात 88 मतदारसंघात मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. मात्र या निवडणुकीत काही ठिकाणी गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरु असलेल्या मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मणिपूरमधील मतदान केंद्रावर हिंसाचार आणि तोडफोड झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २२ एप्रिल रोजी या मतदारसंघात पुन्हा मतदान पार पडलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याच संदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट करत कोणतेही बटन दाबल्यानंतर कमळालाच मत जात असल्याचे म्हटलं होतं. यासोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये काही महिला मतदान केंद्रावर तोडफोड करताना दिसत होत्या.
जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं?
“मणिपूरमध्ये महिलांनी कोणतेही बटन दाबल्यानंतर फक्त कमळच छापलेले दिसत असल्याचे पाहून ईव्हीएम मशीन फोडले. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेपासाठी आवाहन करतो. इतर पक्षाचे चिन्ह छापलेले पाहून भाजप कार्यकर्त्यांना राग येतो असे का होत नाही?,” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
मणिपूर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
“फेक न्यूज: येथे दिसणारा व्हिडिओ हा इम्फाळ पूर्वेतील एका मतदान केंद्रात (३/२१ खुराई विधानसभा) जमावाच्या हिंसाचाराचा आहे आणि त्या मतदान केंद्रावर २२ एप्रिल २०२४ रोजी फेरमतदान आधीच झाले आहे. VVPAT द्वारे आलेल्या पेपर स्लिपमध्ये आणि बॅलेट युनिटवर दाबलेल्या बटणाचे चिन्ह जुळत नसल्याचा आरोप कोणीही केलेला नाही किंवा सापडला नाही. फेक न्यूज पसरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असे मणिपूर निवडणूक आयोगाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांनी ईव्हीएम फोडल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे सत्य समोर आलं होतं. मणिपूरमधील मोइरांग कंपू येथील मतदान केंद्रावर स्थानिक लोकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत ईव्हीएमची तोडफोड केली होती. १९ एप्रिलच्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये ११ मतदान केंद्रांवर झालेल्या निवडणुका रद्द घोषित केल्या आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सात केंद्रांवर आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील चार केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे जाहीर केले. मुक्त आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करण्यासाठी या मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह अतिरिक्त सुरक्षा दलांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली होती.