Manipur Polling Booth Firing : आज देशभरातील 102 लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईशान्येकडील मणिपूरमधील मोइरांगमध्ये मोठा गोंधळ उडाला. मोइरांग विधानसभा मतदारसंघातील थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ गोळीबाराची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली. गोळ्यांचा आवाज ऐकून मतदार सैरावैरा धावू लागले. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये मतदार पळताना दिसत आहेत.
इंफाळ पूर्व मतदान केंद्रात घुसखोरीचा प्रयत्न!यापूर्वी इंफाळ पूर्वेतील खोंगमन येथील मतदान केंद्रावर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सशस्त्र हल्लेखोरांनी मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम फोडले. एवढंच नाही तर हल्ल्यात तीन जण जखमीही झाले आहेत. घटनेच्या वेळी पोलिस अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.