नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. ही माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झळकला होता. ताे चित्रित करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील खटल्याचे कामकाज दुसऱ्या राज्यातील न्यायालयात व्हावे, अशी विनंती करणारी याचिका केंद्र सरकार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याचे समजते.
मैतेई व कुकींसाेबत चर्चा
मणिपूरमधील संघर्षादरम्यान घडलेल्या पाच अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास याआधीच सीबीआयकडे सोपविला आहे. तेथे शांतता प्रस्थापित हाेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी मैतेई व कुकी जमातीच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.