इंफाल – मणिपूरच्या घटनेने इतकं दु:ख झालंय ते शब्दात सांगता येत नाही. कारगिलमध्ये देशाच्या रक्षणासाठी लढलो पण आता निवृत्त झाल्यानंतर पत्नीचं रक्षण करता आले नाही. एका महिलेचे कपडे उतरवून जमावाने जे कृत्य केले त्याचा विचारही केला नव्हता अशा शब्दात माजी सैनिकाने त्यांच्यावर घडलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे. मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
मणिपूरच्या घटनेत एकूण ३ महिलांपैकी २ महिलांना नग्न करून रस्त्यावरून फिरवले. FIR मध्ये असा उल्लेख आहे की, तिसऱ्या महिलेला कपडे काढण्यास मजबूर केले परंतु व्हिडिओत ती दिसली नाही. भारतीय सैन्यात सुभेदार पदावरून निवृत्त झालेले महिलेचे पती ज्यांनी कारगिल युद्धही लढले आहे. मणिपूरच्या हिंसाचारात त्यांचे घर, संपत्ती आणि आता इज्जतही गेली आहे. मी युद्ध पाहिले आहे. कारगिलमध्ये लढाई केली आहे. परंतु आता मला माझेच राज्य युद्ध मैदानाहून अधिक धोकादायक वाटते असं विधान निवृत्त सैनिकाने केले आहे.
संतप्त प्रकारानंतर महिला मानसिक तणावाखाली
४२ वर्षीय महिलेने सांगितले की, आम्हा दोघींना हजारो पुरुषांसमोर बंदुकीच्या धाकावर कपडे बळजबरीने उतरवण्यास भाग पाडले. हे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला नग्न केले, धक्काबुक्की केली, रस्त्यावरून फिरवले असं म्हटलं. तर या प्रकारामुळे पत्नी मानसिक तणावाखाली आली. ३-४ मे रोजी हजारो लोकांच्या जमावाने आमच्या गावावर हल्ला केला. घर, चर्च जाळली, पाळीव प्राण्यांनाही सोडले नाही. घरे जाळायला लागल्यावर ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले. त्यात माझी पत्नी आणि मी दुरावलो. ती आणि अन्य ४ जण जंगलात एका झाडामागे लपले होते. काही लोक त्यांच्या मागावर होते. त्यांना लोकांनी पकडले. ३ महिलांचे कपडे उतरवले, एका मुलीसोबत अतिप्रसंग होत होता, त्याला बाप-लेकाने विरोध केला तर जमावाने त्यांनाही ठार केले. तक्रारीच्या आधारे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटलं आहे की, २१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलगी बेपत्ता असल्याने गँगरेपची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दोन ते तीन तास हा खेळ सुरू होता. जमाव हिंसक झाल्यावर सर्व गावकरी घटनास्थळावरून पळून गेले.