इंफाळ - मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांनी दबा धरून भ्याड हल्ला केला. हा हल्ला शनिवारी सकाळी १० वाजता शेखन-बेहिआंग पोलिस स्थानक परिसरामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर त्यांचे कुटुंबीय आणि क्यूआरटीसोबत जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या चार जवानांना वीरमरण आले. (Terror Attack on 46 Assam Rifles Commanding officer)
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हे अमानवीय आणि दहशतवादी क्रृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे भ्याड कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असा इशारा दिला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, क्विक रिअॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यही या ताफ्यामध्ये होते. दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अध्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही, आता याबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे.