राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेला जिथून सुरुवात केली जाणार होती, त्या मणिपूर राज्यातच परवानगी मिळालेली नाहीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्रा यांनी आज मुख्यमंत्री एन बीरेन यांची भेट घेतली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी यास परवानगी दिली नसल्याचे केशम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
एक दिवस आधीच बीरेन सिंह यांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी देण्यावर सक्रियतेने विचार सुरु असल्याचे म्हटले होते. सुरक्षा एजन्सींच्या अहवालानंतर यावर निर्णय घेण्यात येणार होता.
ही राजकीय यात्रा नाही, त्यामुळे सरकारने याचे राजकारण करू नये. संकटग्रस्त मणिपूरमधील लोकांच्या जखमा भरून काढणे आणि द्वेष संपवून प्रेमाचा संदेश देणे हा यात्रेचा उद्देश आहे, असे वेणुगोपाल म्हणाले होते. दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि केसी वेणुगोपाल यांनी या यात्रेचा रोड मॅप आणि पॅम्प्लेट जारी केले होते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी १४ जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत संपेल. लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 4 महिने आधी निघणाऱ्या या यात्रेत 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांचा समावेश असेल. या काळात राहुल पायी आणि बसने 6 हजार 200 किलोमीटरहून अधिक अंतर कापतील.