नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार, वाढती महागाई, बेरोजगारी, रेल्वे सुरक्षा आणि विविध राज्यांच्या राज्यपालांनी स्वत:च्या वागणुकीने देशाच्या घटनात्मक चौकटीवर केलेला हल्ला यासह देशातील विविध गंभीर प्रश्नांवर संसदेत केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे प्रतिपादन करतानाच पक्षाने रविवारी यासदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या आणि रणनीती गटाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, सीसीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संपर्क विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘पंतप्रधानांनी दोन महिन्यांनंतरही मणिपूर हिंसाचारावर मौन सोडले नाही, त्यांनी त्यांचे मौन सोडावे, अशी पक्षाची इच्छा आहे.’
याशिवाय, त्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करीत गृहमंत्र्यांच्या मणिपूर दौऱ्यातून काहीही निष्पन्न झाले नाही कारण अशांत राज्यात हिंसाचार सुरूच आहे, असा आरोप केला. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची खासदारांना माहिती दिली, अशा बैठका सुरूच राहतील आणि पुढील बैठक बंगळुरूमध्ये होईल, असे खरगे म्हणाले. समान नागरी संहितेबाबत काँग्रेस नेते म्हणाले, पक्षाने १५ जून रोजी भूमिका आधीच स्पष्ट केली होती. गेल्या १५ दिवसांत या प्रकरणात नवीन काहीही आले नसल्याने पक्षाकडे त्यात जोडण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले.