Manipur Controversy: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून याबाबत तीव्र पडसाद उमटत आहेत. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दरम्यान, घटेनेतील पीडित महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या क्रूरतेची कहाणीही सांगितली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या मुद्द्यावर बोलताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत रोखठोक भूमिका मांडली.
जमावाने दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. अशा घृणास्पद कृत्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यासुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. देशभरातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार व कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली. समाजातील महिलांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे. महिलांवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सरकार, नागरी समाज यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याचे आव्हान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
धक्कादायक व्हिडिओबाबत देशभरातील नागरिकांकडून संताप आणि व्यापक निषेध व्यक्त केला आहे. महिलांवरील अशा भयंकर अत्याचारांकडे समाजाने प्रेक्षकाच्या भूमिकेत राहू नये व त्यावर सरकारला जाब विचारण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे. महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी शासनाने कठोर पावलं उचलावी. तसेच भारतीय समाजाला या विषयावर सचेतन करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडली.
महिलांच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण हा जन्मजात मानवी हक्क आहे व यासोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या हिंसेमुळे आपल्या समाजाच्या नैतिक जडणघडणीला हरताळ फासला जातोच, पण जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमाही कलंकित होते, असे तपासे म्हणाले.