देशातील इशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधून सातत्याने हिसंचाराच्या घटना समोर येत आहेत. आता, येथील मैतेई समुदायाच्या लोकांनी 4 जणांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे, यात एका सैनिकाच्या घरातील तीन जणांचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (07 नोव्हेंबर) इंफाळ पश्चिम जिल्ह्यात घडली. यानंतर येथे पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे.
अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "मैतेई समाजाच्या लोकांनी 5 जणांचे अपहरण केले होते. यांत एका 65 वर्षीय वृद्धाचाही समावेश होता. महत्वाचे म्हणजे, या वृद्धाची सुटका करण्यात आली असून इतर 4 जणांची माहिती मिळू शकलेली नाही. यांत दो पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
काय म्हणतायत पोलीस? - एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, “पाच कुकी समुदायाचे लोक चुराचांदपूर वरून कांगपोकपी (दोन्ही कुकी समुदायाच्या प्रभुत्वाखालील जिल्ह्ये) येथे जात होते. ते कांगपोकपीच्या सीमेवरील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात (मैतेई बहुल जिल्हा) पोहोचले. तेव्हा येथे मैतेई समाजाच्या एका समूहाने त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षारक्षकाने नंतर, या पाच पैकी एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. ते जखमी झाले आहेत. मात्र इतर चार जणांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
यानंतर, या व्यक्तीची ओळख मंगलून हाओकिप नावाने झाली आहे. त्यांना मंगळवारी सायंकाळी नागालँडमधील दीमापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीला हवाई मार्गाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. यासंदर्भात बोलताना, कांगपोकपीचे पोलीस अधीक्षक (एसपी) एम प्रभाकर म्हणाले, "आमचे चमू इतर चार जणांना वाचविण्यासाठी सर्च ऑपरेशन करत आहेत." नेंगकिम (60), नीलम (55), जॉन थांगजाम हाओकिप (25) आणि जामखोतांग (40), अशी अपहरण करण्यात आलेल्या चारही लोकांची नावे आहेत.