biren singh : मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, अनेक नाट्यमय घडामोडींमुळे मणिपूरमध्ये आज राजकारण तापल्याचे दिसले. राजीनामा देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री सिंह यांचे राजीनामा पत्र महिला आंदोलकांनी फाडले. कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी खुलासा केला असून राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री बिरेन सिंह राजभवनाकडे रवाना झाले. अशातच काही महिला समर्थकांनी राजभवनासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे जाऊ दिला नाही. यादरम्यान काही महिला आंदोलकांनी मुख्यमंत्र्याचे राजीनामा पत्र फाडले आणि त्यांच्या राजीनाम्यास विरोध दर्शवला. मोठ्या गदारोळानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सिंह यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही - बीरेन सिंह
महिला आंदोलकांनी राजीनामा पत्र फाडले
रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत १८ पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.