मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:20 PM2023-07-24T16:20:23+5:302023-07-24T16:21:13+5:30
Amit Shah On Manipur Violence: मणिपूर हिंसेचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत उमटत आहेत. सोमवारी दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.
Parliament Monsoon Session: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे (Manipur Violence) पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटत आहेत. सोमवारी (24 जुलै) देखील दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मणिपूरवर आम्ही सभागृहात चर्चा करण्यास तयार आहोत, असे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी(दि.24) राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मणिपूरवर पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेची मागणी करत घोषणाबाजी केली. विरोधकांच्या विरोधादरम्यान राज्यसभेच्या अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले होते की, आम्ही संसदेत चर्चेसाठी तयार आहोत.
#WATCH | Government is ready for discussion on Manipur. Request Opposition to let discussion take place, says Union Home Minister Amit Shah in Lok Sabha. pic.twitter.com/rjHLzOcKu7
— ANI (@ANI) July 24, 2023
दरम्यान, लोकसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, 'आम्ही मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यास तयार आहोत, पण विरोधकांना चर्चा नकोय. मी विरोधकांना विनंती करतो की, या विषयावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील प्रकरणातील सत्य देशाला कळणे गरजेचे आहे.' अमित शहा बोलत होते तेव्हा विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजीही केली. या सर्व गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारी (25 जुलै) सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र?
या मुद्द्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्हीही या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहोत. पंतप्रधानांनी या विषयावर आपले म्हणणे मांडावे. जर 140 कोटी जनतेचे प्रमुख सभागृहाबाहेर पत्रकारांशी या विषयावर बोलू शकतात, तर त्यांनी 140 कोटी जनतेचे प्रतिनिधींसमोर सभागृहात बोलावे.