गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा उफाळून आला आहे. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येवरून संतप्त झालेल्या जमावाने काही वेळापूर्वीच मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या घराकडे मोर्चा वळविला होता. बीरेन सिंह यांचे वडिलोपार्जित घर जाळण्याचा या जमावाचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.
मणिपूरची राजधानी गेल्या दोन दिवसांपासून धगधगू लागली आहे. जमावाने कालच भाजपाचे एक कार्यालय जाळले होते. यानंतर आज पहाटे इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात देखील तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दुचाकींना आगी लावण्यात आल्या आहेत.
बीरेन सिंह हे त्यांच्या घरी राहत नसून सरकारी निवासस्थानी राहतात, यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इंफाळच्या हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांचे वडिलोपार्जित घर आहे, त्याच्यावर आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर फौजफाटा होता. यामुळे या जमावाला घरापासून १०० मीटर अंतरावरच रोखण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला.