BJP MLA On Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. अलीकडे महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. यातच आता मणिपूरमधील भाजप आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार पाओलिनलाल हाओकीप यांनी या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
आमदार पाओलिनलाल हाओकीप म्हणाले की, 79 दिवस विसरुन जा, एवढ्या मोठ्या हिंसाचाराविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी एक आठवडासुद्धा खूप जास्त आहे. पाओलिनलाल हे स्वतः कुकी-झोमी समुदायातून येतात. पंतप्रधान मोदींचे प्राधान्यक्रम पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण ते यशस्वी होऊ शकले नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
हाओकीप काय म्हणाले?एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पाओलिनलाल हाओकीप म्हणाले, आंतरराष्ट्रीय संबंधांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, परंतु जिथे लोक मारले जात आहेत, ते प्रकरण सोडवण्याकडे आधी लक्ष दिले पाहिजे. या माणुसकीचा अभाव आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती, पण मला प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही परिस्थितीचे गांभीर्य सांगण्यासाठी संधीची वाट पाहत आहे.
पाओलिनलाल हाओकीप 10 कुकी आमदारांपैकी एक आहेत, ज्यांनी एका पत्रात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आदिवासी गटाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत 'वेगळ्या प्रशासनाची' मागणी केली होती.मणिपूरचे सध्याचे सरकार चिन-कुकी-मिझो-झोमी या डोंगराळ आदिवासींचे समर्थन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.