मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीबीआयने हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सीबीआय सामुहिक अत्याचार प्रकरणी नवी एफआयआर (सातवी एफआयआर) दाखल करणार आहे.
मणिपूरमध्ये ८६ दिवसांपासून हिंसाचार होत आहे. यादरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले की, आम्ही मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सुनावणी पूर्ण करण्यासाठी सुप्रिम कोर्टाकडून प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याची विनंती केली आहे.
सुप्रीम कोर्टात देण्यात आलेल्या शपथपत्राबरोबरच गृहमंत्रालयाने राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह मैतेई आणि कुकी समुदायातील दोन्ही वरिष्ठ प्रतिनिधींशी संपर्क ठेवून आहेत. तसेच दोन्ही समुदायांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. मात्र दोन्ही समुदायातील समेटाबाबत अद्याप मतबेद आहे. मात्र लवकरच चर्चेतून काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.