मणिपूरमध्ये आरक्षणावरून सुरु असलेला वाद, हिंसाचार पुन्हा उफाळून आला आहे. या हिंसाचारात दोन दिवसांपूर्वी दोन जवानांचा मृत्यू झाला होता. आता वेगवेगळ्या घटनांत पिता-पुत्रासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.
विष्णुपूर जिल्ह्यातील पोलीस स्थानक हद्दीतील निंगथौखोंग खा खुनौमध्ये गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पिता-पुत्रासह तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुत्रांनुसार सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे निंगथौखोंग बाजार आणि बाजुच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. यापूर्वी बुधवारी रात्री कांगचूप गावात २६ वर्षीय मैतेई समुदायाच्या ग्राम रक्षा स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली.
निंगथौखॉन्ग येथील छोट्या पाण्याच्या टाकीतून पहिल्या घटनेतील तिघे पाणी आणत होते. तेव्हा पाच जणांनी त्यांना रोखले आणि गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आणि त्यांनी न्यायाची मागणी करत आंदोलन केले.
बुधवारपासून घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. यामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यंतरीच्या काळात हा हिंसाचार थांबल्याचे चित्र होते, परंतु आता पुन्हा हिंसाचार उफाळून येऊ लागला आहे.