'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 05:57 PM2023-07-27T17:57:41+5:302023-07-27T17:57:53+5:30
Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे.
Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ सुरू आहे. अधिनेशनाच्या पहिल्या दिवसापासून संसदेत सुरू असलेल्या गदारोळानंतर आता विरोधी पक्षांनी नवी रणनीती आखली आहे. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (INDIA) विरोधी आघाडीतील खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला दौऱ्यावर जाणार आहे. 29 आणि 30 जुलै रोजी हे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक खासदारांचे शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला भेट देणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांची भेट घेतली होती. मात्र, राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावरून बराच वाद झाला होता.
विरोधी पक्षांची संसदेत मागणी
सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर संसदेत चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान काँग्रेसने लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला, जो सभागृहात चर्चेसाठी मंजूर करण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवतील. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर वक्तव्य करण्यास भाग पाडण्याचा हा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे.