मणिपूरमध्ये मैतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात 3 मे रोजी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. या आदिवासी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला, त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि संपूर्ण मणिपूरमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
मेरी कॉमने मध्यरात्री 3.45 च्या सुमारास ट्विट केलं आहे. "माझं राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा" असं म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले आहेत. मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला.
3 मेच्या रात्री राज्य सरकारकडून लष्कर आणि सशस्त्र दलाची मदत मागवण्यात आली होती, त्यानंतर राज्य पोलिसांसह लष्कराने रात्री उशिरा हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सकाळपर्यंत हिंसाचार आटोक्यात आला. विविध जिल्ह्यांतील लष्कर, सशस्त्र दल आणि राज्य सरकारच्या आवारात सुमारे चार हजार ग्रामस्थांना आश्रय देण्यात आला. त्याचवेळी आंदोलन नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे.
मैतेई समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने (ATSU) मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान चुराचांदपूरमध्ये हिंसाचार झाला. या रॅलीत हजारो आंदोलक सहभागी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याच दरम्यान तोरबांग भागात आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती मिळाली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"