मणिपूरमधील हिंसाचार शांत होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठिकाणी अजूनही गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 11.45 वाजता पूर्व मणिपूरमधील थांगजिंग येथे स्वयंचलित शस्त्रांमधून सुमारे 15-20 राऊंड गोळीबार ऐकू आला. गेलजँग आणि सिंगडा येथूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान, भाजपाच्या नऊ आमदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लोकांचा मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावरील विश्वास उडाला आहे असं सांगितलं.
पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी त्यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. लोकांचा राज्य सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. योग्य प्रशासन आणि कायद्याचे पालन करून काम करण्यासाठी काही विशेष उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा स्थापित होईल. हे निवेदन विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाही, तर भाजपाच्या आमदारांनी पंतप्रधानांना दिले आहे.
नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेचा पाठिंबा गमावला आहे, हे सर्व मणिपूरचे भाजपा आमदार आहेत आणि त्यात करम श्याम सिंह, राधेश्याम सिंह, निशिकांत सिंह सपम, रघुमणी सिंह एस. ब्रोजेन सिंह, टी रॉबिंद्रो सिंह, एस राजेन सिंह, एस केबी देवी आणि डॉ. वाय. राधेश्याम यांचा समावेश आहे. हे सर्व मैतेई समाजाचे आहेत. राज्यातील मैतेई आणि कुकी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्यमंत्र्यांवर त्यांच्याच समुदायाचे, मैतईचे समर्थन केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.
बिरेन सिंह सरकारला अपयशी ठरवणाऱ्या या निवेदनाकडे मणिपूर भाजपामधील असंतोषाचा आणखी एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 20 मे रोजी, नऊपैकी आठ स्वाक्षरी करणारे आमदार, हे 30 भाजपा आमदारांच्या गटात सामील झाले जे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, ज्यात त्यांचे जावई राजकुमार इमो सिंह यांचा समावेश आहे. करम श्याम सिंह यांनी तर काही लोक पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मणिपूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत, असे विधान केलं.
एप्रिलमध्ये, करम श्याम यांनी मणिपूर पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आरोप केला की, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. केवळ करम श्यामच नाही तर स्वाक्षरी करणारे तीन इतर - राधेश्याम सिंह, एस ब्रोजेन सिंह आणि रघुमणी सिंह यांनी अप्रत्यक्षपणे बीरेन सिंह यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि सरकारमधील विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदांचा राजीनामा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.