मणिपूरमधील हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, मणिपूरमध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. 54 मृतांपैकी 16 जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्फाळ पूर्व येथे आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत.
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, समुदायांमधील भांडणात अनेक लोक मारले गेले आहेत. याशिवाय सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. पोलीस मात्र याची पुष्टी करण्यास तयार नव्हते. हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अनेकांवर RIMS आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.
13,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले
संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, तणावग्रस्त भागात अडकलेल्या एकूण 13,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. लष्कराच्या पीआरओने सांगितले की, सुरक्षा दलांच्या तत्पर कारवाईमुळे हिंसाचारग्रस्त भागातील विविध अल्पसंख्याक भागातील लोकांची सुटका करण्यात आली. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"माझं मणिपूर जळतंय..."; मेरी कॉमने मध्यरात्री पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
मणिपूरमध्ये पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. मेरी ट्विट केलं होतं. "माझं राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा" असं म्हटलं होतं. तसेच या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले होते. मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला.