Parliament Monsoon Session 2023:मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. आज राज्यसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. प्रकरण इतके वाढले की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही सुनावले.
पंतप्रधान मोदी सभागृहात का बोलत नाहीत?राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज मणिपूर जळत आहे. आपण सर्व मणिपूरबद्दल बोलत आहोत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. मोदी सभागृहात का बोलत नाहीत? सरकार चर्चेसाठी तयार असेल तर 267 वर चर्चा करायला काय हरकत आहे? तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोललात तर मणिपूरबद्दल बोलायला काय हरकत आहे? असा प्रश्न खर्गेंनी उपस्थित केला.
गोयल यांचे प्रत्युत्तरखर्गेंना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, हा संवेदनशील विषय आहे, या विषयावर चर्चा होण्याची गरज आहे. कदाचित विरोधी पक्षनेत्यामध्ये संवेदनशीलता नाही, त्यांना मनं नसेल, म्हणूनच ते मुलींच्या बाबतीतही राजकारण करत आहेत. तुम्हाला मनं असते, तर या विषयावर आतापर्यंत सभागृहात चर्चा सुरू झाली असती. इतक्या संवेदनशील विषयावरही तुम्ही राजकारण करत आहात. मणिपूर प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा बोलणार आहेत. मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधीस महिलांवरील अत्याचारांवरही चर्चा व्हायची आहे, असंही गोयल म्हणाले.