मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:40 PM2023-07-21T13:40:53+5:302023-07-21T13:41:45+5:30
संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे काम होऊ शकले नाही.
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात सुरू असलेला हिंसाचार आणि महिलांसोबत घडलेल्या घटनेचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. विरोधक मणिपूरवर चर्चा घेण्याची मागणी करत असून, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
संसदेत काल झालेल्या गदारोळामुळे मणिपूर हिंसाचार आणि केंद्राच्या अध्यादेशावर चर्चा होऊ शकली नाही. आज संसदेचे कामकाज सुरू होताच पुन्हा प्रचंड गदारोळ झाला. मणिपूर हिंसाचारावर आज पुन्हा एकदा दोन्ही सभागृहात चर्चा झाली. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
मणिपूर हिंसाचारावर संसदेत झालेल्या गदारोळाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, काही पक्षांना चर्चा होऊ द्यायची नाही. विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, पण मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, घोषणाबाजीने प्रश्न सुटणार नाही.
अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मणिपूरच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये जे घडले, ते अतिशय लज्जास्पद आहे. या घटनेबाबत मी तुम्हाला खात्री देतो की, जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. या घटनेला 77 दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला.
मणिपूरमध्ये महिलांना नग्न करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देश हादरला आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सरन्यायाधीश खूप दुखावले असून त्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर काँग्रेससह अनेकांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन यांना हटवण्याची मागणी केली आहे. सध्या कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी, याला सरकारचे प्राधान्य असेल.