गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये तीन महिलांचं लैंगिक शोषण करून त्यापैकी दोघींची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मणिपूरमधील राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर विविध क्षेत्रांमधून या घटनेचा निषेध केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊन जगभरात खळबळ उडण्यापूर्वीच तो डिलीट झाला असता. मात्र या प्रकरणातीस एका आरोपीने केलेल्या एका चुकीमुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला, अशी माहिती समोर आली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी मणिपूरमधील संघटनांकडून तो दाबण्याचा प्रयत्न झाला होता. ४ मे रोजी मणिपूर मणिपूरमध्ये ३ कुकी-जोमी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. दरम्यान, आरोपींपैकी एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओ काढला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी आरोपी युमलेम्बम जिबन याला पकडण्याचे प्रयत्न झाले होते. त्याच्यात फोनमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला होता.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १८ वर्षीय जिबन याने आपल्या फोनमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होत. जिबन हा महिलांची धिंड काढल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींपैकी एक आहे. त्याला इतर आरोपींसोबत सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जिबन याच्या थौबल जिल्ह्यातील नोंगपोक सेकमई अवांग लिकाई गावातील एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार जिबन याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, आणि तो त्याच्या मोबाईलमध्ये आहे, हे गावातील ज्येष्ठ मंडळींना माहिती होते.
या नातेवाईकाने पुढे सांगितले की, गावातील या ज्येष्ठ मंडळींनी त्याला हा व्हिडीओ डिलीट करायला सांगितले. त्याने व्हिडीओ डिलीट करतो म्हणून सांगितलं. पण त्याने तो व्हिडीओ मोबाईलमधून हटवला नाही. उलट त्याने तो व्हिडीओ त्याच्या चुलत भावाला पाठवला. त्याने तो व्हिडीओ त्याच्या मित्राला पाठवला. मला वाटतं की, त्या व्यक्तीकडून अरामबाई तेंगगोल याला या व्हिडीओबाबत समजलं. तो जूनमध्ये गावात आला. त्याने ग्रामस्थांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आम्ही सर्वांनी आपले फोन त्याच्याकडे दिले. त्याने फोन तपासले आणि जिबनच्या मोबाईलमधून तो व्हिडीओ हटवला.
दरम्यान, पोलिसांनी जिबन याचा चुलत भाऊ युमलेम्बम नुंगसिथौ यालाही अटक केली आहे. जिबन हा थौबल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर नुंगसिथोई एका मेकॅनिकच्या दुकानात काम करत होता. दोघेही शेतकऱ्यांची मुलं आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतर लोकांमध्ये एका सेवानिवृत्त सरकारी शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा मुलगा, टायरच्या दुकानात काम करणारा एक तरुण आणि एका मोलमजुरी करणाऱ्याचा समावेश आहे.