इंफाळ: मणिपूरमध्ये ३ मेपासून आरक्षणावरून कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचाराची आग वाढतच चालली आहे. येथे आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा हिंसाचार उसळला. १० लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या इंफाळ येथील घराची तोडफोड करून ते पेटवून दिले.
सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी रात्री आग लावण्याचा जमावाचा प्रयत्न हाणून पाडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी केरळ दौऱ्यावर असलेले सिंह तेथील कार्यक्रम रद्द करून मणिपूरकडे निघाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बुधवारी हत्या करणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
...या नेत्यांना केले आतापर्यंत लक्ष्य!
गेल्या २० दिवसांत मणिपूरमधील मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे. याआधी १४ जूनला इंफाळच्या लामफेल भागात उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत बंगल्याला आग लावण्यात आली होती. त्यावेळी किपगेन घरी नव्हते. ८ जून रोजी भाजप आमदार सोरासम केबी यांच्या घरावर आयईडी हल्ला झाला होता. २८ मे रोजी काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घरावरही हल्ला झाला होता.
आतापर्यंत काय झाले?
- ३ मे पासून हिंसाचार सुरू
- १००+ जणांचा मृत्यू
- ४००+ जखमी
- ८० हजारपेक्षा अधिक लोकांनी घर सोडले
- २० दिवसांमध्ये चार मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ले
जवानांना ताजे जेवण मिळेना
मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या सात बटालियनला गेल्या १८ दिवसांपासून ताजे जेवण मिळाले नाही. आसाम रायफल्स कुकी समुदायाची बाजू घेत असल्याचा आरोप करत मेतेई समुदायाने ताजे रेशन मिळण्याचे सर्व रस्ते ब्लॉक केले आहेत.
भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांहून अधिक काळ हिंसाचाराच्या आगीत जळत ठेवले आहे, ज्यात शंभरहून अधिक लोक मारले गेले. पंतप्रधान पूर्णपणे गप्प आहेत. हिंसाचार संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवावे. हा द्वेषाचा बाजार बंद करूया आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान उघडूया. -राहुल गांधी, काँग्रेस नेते
रात्री १० च्या सुमारास ५० हून अधिक लोकांनी माझ्या घरावर हल्ला केल्याचे मला सांगण्यात आले. हिंसाचाराच्या घटनांमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. -राजकुमार रंजन सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री
म्यानमारमधून ३०० सशस्त्र लोकांची घुसखोरी
३०० सशस्त्र लोक म्यानमारमधून राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे. तोरबुंगच्या जंगलात तळ बनवल्यानंतर हा हिंसाचार करणारा गट चुरचंदपूरकडे वळला आहे. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा ड्रोनचा वापर करत आहेत.