मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये मंगळवारी दोन गटांमध्ये गोळीबार झाला. जाळपोळ आणि गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भाजपच्या युवा नेत्यासह पाच जण या हिंसाचारात जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ३ मेपासून राज्यात हिंसाचार उसळला आहे.
मणिपूरमधील हिंसाचार मंगळवारीही सुरूच होता. दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले तर राज्यातील भाजपच्या युवा नेत्यासह किमान पाच जण जखमी झाले.
‘PM मोदी आणि भारतीयांची माफी मागा', मालदीवच्या विरोधीपक्ष नेत्याचा मोहम्मद मुइज्जूंना सल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक गावात गोळीबार झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. किमान एक व्यक्ती बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. या हिंसाचारात भाजपच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मनोहरमायुम बारीश शर्मा गोळीबारात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इम्फाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमेवर दोन समुदायांच्या ग्रामस्थांमध्ये गोळीबार झाला. हिंसाचारानंतर इम्फाळ खोऱ्यातील कडंगबंद, कौत्रुक आणि कांगचूप या गावांमध्ये खळबळ उडाला आहे. मंगळवारची घटना इम्फाळ आणि कांगपोकपी जिल्ह्याच्या दरम्यानच्या भागात दोन सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका गावकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या दोन दिवसानंतर घडली आहे.
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ३ मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात १८० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि ३००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्यात किमान ६०,००० केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही आठ महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरूच आहे.