Manipur Violence News इम्फाळ : जमावाच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी मणिपूरचे अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री एल. सुसिंद्रो मैतेई यांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील आपल्या वडिलोपार्जित घराला काटेरी कुंपण घातले आहे. त्या घरावर १६ नोव्हेंबर रोजी जमावाने हल्ला केला होता. माझ्या घरावर हल्ला करणाऱ्या लोकांवर तिथे तैनात सुरक्षा दलांच्या जवानांनी आम्ही दिलेल्या सूचनेनुसार गोळीबार केला नाही. मात्र जर पुन्हा असा हल्ला झाला तर आम्हाला स्वत:ची मालमत्ता, जीव यांचे रक्षण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असा सूचनावजा इशारा मैतेई यांनी दिला.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली आहे, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. १६ नोव्हेंबर रोजी हे हल्ले झाले होते.
नऊ जणांच्या मृतदेहांवर झाले अंतिम संस्कार
जिरिबाम जिल्ह्यात मैतेई जमातीतील तीन महिला, तीन लहान मुले यांच्यासह नऊ जणांच्या मृतदेहांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात आले. आसामच्या कचर जिल्ह्यातील सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली होती.
‘हे काँग्रेसच्या अपयशाचे परिणाम’
काँग्रेसच्या अपयशाचे परिणाम आजही मणिपूरमध्ये जाणवत असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला.
मणिपूरच्या हिंसाचाराबाबत चुकीचा, खोटा व राजकीय हेतूने प्रेरित चर्चा घडवल्या जात असल्याचा आरोप करत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती नड्डा यांनी राष्ट्रपतींकडे केली.
मणिपूरमध्ये काँग्रेसचे सरकार असताना स्थानिक समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आले. त्याचे दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत.
नड्डांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : काँग्रेस
भाजप अध्यक्ष नड्डांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केलेले आरोप पूर्णपणे खोटे असून मणिपूरच्या मुद्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात आलेले अपयशाची जबाबदारी केंद्र सरकार कधी घेणार? असा सवाल करीत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी नड्डांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.