Manipur Women Video: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होतोय. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तर, सोनिया गांधी यांनी मोदींना मणिपूरवरबाबत चिंता व्यक्त केली.
काय म्हणाल्या सोनिया गांधी?पीएम मोदींनी प्रकृतीबाबत विचारणा केल्यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, 'माझी प्रकृती ठीक आहे, पण मणिपूर सध्या ठीक नाहीये. मला मणिपूरच्या महिलांची काळजी आहे. यावर अधिवेशनात चर्चा व्हायला हवी.' पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यातील या संवादाबाबत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, 'ही एक सामान्य भेट होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी सर्व खासदारांची विचारपूस केली. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना मणिपूरवर सभागृहात चर्चा करण्याचे आवाहन केले.'
विरोधकांकडून मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणीविरोधी पक्ष सातत्याने मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करत आहे. आज सभागृहातही त्यावर गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस खासदार म्हणाले की, जेव्हा आम्ही त्यांना मणिपूरबद्दल विचारतो तेव्हा ते राजस्थानबद्दल बोलू लागतात. विशेष म्हणजे, सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यातही मणिपूर हिंसाचाराबाबत व्हिडिओ जारी करुन केंद्र सरकारला प्रश्न विचारले होते.
विरोधी खासदारांचा गोंधळमणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करत आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी खासदारांनी हिंसाचारावर चर्चेचे आवाहन केले. राजद खासदार मनोज झा म्हणाले की, सरन्यायाधीशांच्या टीकेनंतरही सरकारला जाग येत नसेल तर याचा अर्थ काय समजायचा. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश म्हणाले की, I.N.D.I.A (विरोधी आघाडी) ने हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी सभागृहात स्थगन नोटीस दिली होती. याशिवाय, पंतप्रधानांनी यावर निवेदन द्यावे आणि त्यावर लोकसभा-राज्यसभेत चर्चा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली.