Manipur Violence Video: गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन महिलांवर अत्याचार करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात देशभरातून तीव्र संताव व्यक्त होतोय. या घटनेबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान एन बिरेन सिंह या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे बिरेन सिंह म्हणाले.
मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, "हे अत्यंत अपमानास्पद आणि अमानवी कृत्य आहे. व्हिडिओ मे महिन्यातील असून, आता समोर आला आहे. व्हिडिओ समोर येताच या घटनेची स्वतःहून दखल घेत मणिपूर पोलिसांनी आज सकाळी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे."
"सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मृत्यूदंडाच्या शिक्षेवरही आम्ही विचार करू. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. समाजात अशा घृणास्पद कृत्यांना अजिबात स्थान नाही," अशी प्रतिक्रिया बिरेन सिंह यांनी दिली. दरम्यान, पीएम नरेंद्र मोदींनीही या प्रकरणावर शोक व्यक्त केला असून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतलीमणिपूरमधील या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, हिंसाग्रस्त भागात महिलांचा वापर केला जातोय. याला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई झाली, हे सांगावे. पुढील आठवड्यात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.