मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच दिवसांपासून राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
केंद्राने मणिपूरमध्ये CRPF बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात जवळपास २००० जवान आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत, या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन ते राजभवनाकडे कूच करत होते.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड फेकले, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आली आहे.
मणिपूर सरकारने मंगळवारी संध्याकाळी एक सुधारित आदेश जारी केला, ज्यामध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने राज्यभरात पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली होती.