मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 08:19 AM2024-01-16T08:19:36+5:302024-01-16T08:19:54+5:30
राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सेनापती (मणिपूर) : काँग्रेस मणिपूरला पुन्हा शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण बनवू इच्छिते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे सांगितले. आपला पक्ष राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले.
राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा राहुल यांची बस येथील गजबजलेल्या भागातून गेली, तेव्हा बहुतांश करून महिला आणि मुलांसह अनेक लोकांनी यात्रा मार्गावर रांगेत उभे राहून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सेनापती येथे बसच्या टपावर उभे राहून त्यांनी लोकांना संबोधित केले.
‘याआधी काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा काढली. लोकांना एकजूट करणे हा या यात्रेचा उद्देश होता. ही यात्रा खूप यशस्वी ठरली. यादरम्यान आपण चार हजार कि.मी. चाललो’, असे ते म्हणाले.
तुमच्या वेदनांची जाणीव
आम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणखी एक यात्रा करायची होती व आम्ही ठरवले की मणिपूरपासून सुरुवात करणे ही सर्वांत प्रभावी गोष्ट असेल.
कारण, यामुळे मणिपूरचे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे भारतीय जनतेला कळू शकेल. तुम्ही सोसलेल्या वेदनांची मला जाणीव आहे, असे राहुल म्हणाले.