इम्फाळ : मणिपुरातील नोने जिल्ह्यात लष्कराने शोधमोहीम राबवून एनएससीएन (आयएम) या अतिरेकी संघटनेच्या एका सदस्याला अटक केली असून शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. काही दस्तावेजही लष्कराच्या हाती लागले आहेत.लष्कराच्या ५७ माऊंटेन डिव्हिजनचे ब्रिगेडियर रावरूप सिंग यांनी सांगितले की, ५ जुलैच्या रात्री लष्कराने ही मोहीम सुरू केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी केकरू नागा गावात तपासणी करून शोधकार्य सुरू करण्यात आले होते. एनएससीएन (आयएम) या संघटनेचे काही सशस्त्र सदस्य येथे दडी मारून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आलीहोती.लष्कराचा सुगावा लागताच अतिरेकी पळून गेले. निसटण्यापूर्वी आपल्याकडील शस्त्रसाठा त्यांनी गावाच्या परिसरात, जवळच्या जंगलात आणि झूम (जंगल जाळून केलेली शेती) झोपड्यांत विविध ठिकाणी लपवून ठेवला. शोधमोहिमेदरम्यान संघटनेचा एक अतिरेकी आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लष्कराच्या हाती लागला. चार रायफली, दोन बॉम्ब लाँचर, मोठ्या संख्येतील दारूगोळा यांचा त्यात समावेश आहे. युद्धसदृश रसद साठाही घटनास्थळी सापडला. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डायºयाही सापडल्या आहेत. ९ जुलैपर्यंत ही मोहीम सुरूहोती.वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, मोठ्या प्रमाणात सापडलेल्या शस्त्रसाठ्यामुळे एनएससीएन (आयएम)च्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. या संघटनेने सरकारसोबत शस्त्रसंधी केली आहे. दोघांच्या संमतीने शस्त्रसंधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शस्त्रसंधीच्या नियमांचे पालन दोन्ही बाजूंनी होणे आवश्यक आहे. तथापि, एनएससीएन (आयएम)कडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे.
मणिपुरात शस्त्रास्त्रे, स्फोटके जप्त, लष्कराची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:30 AM