मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:55 AM2023-08-01T08:55:28+5:302023-08-01T08:57:31+5:30

दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला.

Manipur's pain is heartbreaking says Congress President Mallikarjun Kharge | मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी मणिपूरच्या दौऱ्यावर असलेल्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) या विरोधी आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हिंसाचारग्रस्त राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला.

या खासदारांनी संसद भवनातील एका कक्षात ‘इंडिया’मधील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बाळू, समाजवादी पक्ष (एसपी) नेते राम गोपाल यादव आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

खरगे यांनी म्हटले की, मणिपूर उलथापालथीचा सामना करत आहे; पण केंद्र सरकार उदासीन दिसत आहे. तेथील लोकांच्या वेदना ऐकल्या, ज्या हृदयद्रावक आहेत. मणिपूरमध्ये सुमारे १० हजार निष्पाप मुलांसह ५० हजारहून अधिक लोक अपुऱ्या सुविधा असलेल्या मदत शिबिरांमध्ये आहेत. लोकांना औषधे आणि अन्नाची कमतरता भासत आहे.

संसद पुन्हा ठप्प
-  मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या काही दिवसांप्रमाणेच सोमवारीही विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे कामकाज ठप्प झाले; परंतु संख्याबळाच्या बळावर अनेक विधेयके मंजूर करून घेणे सुरूच राहिले. 
-  लोकसभा एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी २ वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेससह विरोधी पक्षांचे सदस्य मणिपूरच्या मुद्द्यावर घोषणा देत व्यासपीठाजवळ आले. लोकसभा अध्यक्ष किरीट सोळंकी यांनी गदारोळातच आवश्यक ती कागदपत्रे पटलावर ठेवली.

हा संसदेचा अवमान
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर सरकार चर्चा करीत नाही, हा संसदेचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही सरकारने आधी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली.

मणिपूरमुळे गोव्यात गदारोळ
मणिपूर प्रश्नावरून गोवा विधानसभेत सोमवारी गदारोळ माजविणाऱ्या विरोधी पक्षांच्या सातही आमदारांना २ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. त्यामध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार अल्तोन डिकोस्टा, कार्लोस फरेरा, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगास, क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्ड पार्टीचे आ. विजय सरदेसाई व रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे आमदार वीरेश बोरकर यांचा समावेश आहे.

पोलिसांना माघारी बोलवा 
मणिपूरमधील मोरेह शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात केलेली राज्य पोलिसांची पथके तिथून त्वरित हटवावीत या मागणीसाठी हजारहून अधिक मणिपुरी महिलांनी चुराचंदपूर येथे सोमवारी धरणे धरले. आमची मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. तेंगनौपाल जिल्ह्यातील कुकी-झो जमातीच्या महिलांनी २८ जुलै रोजी मोरेह येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. या शहरात पोलिस पथकांनी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी निदर्शनेही केली होती. 

भारतीय फुटबॉलपटूचे घर जमावाने जाळले
भारतीय फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंह हे मणिपूरचे मूळ रहिवासी आहेत. मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात त्यांचे घर जमावाने जाळले होते. त्याबाबत चिंगलेनसाना सिंह यांनी सांगितले की, मला कळले की चूरचांदपूर जिल्ह्यातील खुमुजामा लेकेई येथील त्यांचे घर जाळण्यात आले. या भीषण घटनेतून सुदैवाने माझे कुटुंबीय वाचले. 

केंद्राने मदत करावी - मिझोराम
हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील १२६०० जणांनी आपले घरदार सोडून मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. या निर्वासितांना निवारा व अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत कधी मिळेल याची मिझोराम सरकार प्रतीक्षा करत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये सोमवारी मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपने विरोध केला होता. 
 

Web Title: Manipur's pain is heartbreaking says Congress President Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.