Manish Sisodia CBI: केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) शुक्रवारी(दि.19) सकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी दाखल झाली. आम आदमी पार्टीच्या (AAP) नवीन दारू धोरणात आढळलेल्या अनियमिततेच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. या क्रमाने, मद्य धोरणावर एफआयआर नोंदवणाऱ्या एजन्सीने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले.
उपराज्यपालांनी केली चौकशीची मागणीयादरम्यान, मनीष सिसोदिया यांनी ट्विट सीबीआयला तपासत मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांच्याशिवाय सीबीआयने माजी अबकारी आयुक्त आणि आयएएस अधिकारी अर्वा गोपी कृष्णा यांचीही चौकशी केली. सिसोदियांवरील आरोप उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आहेत. मोठा वाद झाल्यानंतर आप सरकारने हे धोरण मागे घेतले होते. या प्रकरणात लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी नियमांचे उल्लंघन आणि प्रक्रियात्मक त्रुटींची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
आप सरकारवर कोणते आरोप?केजरीवाल सरकारने नोव्हेंबरपासून दिल्लीत अबकारी धोरण लागू केले होते, ज्यामध्ये राज्यातील सर्व सरकारी दारुची दुकाने बंद करुन दारुची विक्री खाजगी हातात देण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभाग मनीष सिसोदिया यांच्याकडे आहे. सीबीआय त्यांच्यावरील तीन आरोपांचा तपास करत आहे.
- पहिला- नवीन धोरणामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले.
- दुसरा- किरकोळ दुकानेही अपात्र लोकांना देण्यात आली.
- तिसरा- आम आदमी पक्षाला कमिशन आणि लाच यातून फायदा झाला. केंद्रीय तपास यंत्रणा या आरोपांची चौकशी करत आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?सिसोदिया यांच्यावरील कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की, ''मनीष सिसोदिया यांना जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री म्हणून घोषित करण्यात आले, पण सीबीआयचे पथक छापा टाकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. अनेक अडथळे येतील, पण काम थांबणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर दिसणे आणि दिल्लीत शैक्षणिक क्रांती आणणे सोपे नव्हते.''
''हा पहिलाच छापा नाही, गेल्या 7 वर्षात मनीष सिसोदिया यांच्यावर अनेक छापे टाकण्यात आले. त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. माझ्यावर, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत यांच्यावरही छापे टाकण्यात आले, पण काहीही सापडले नाही. आताही त्यांना काहीही मिळणार नाही. सीबीआय आपले काम करत आहे, घाबरण्याची गरज नाही. सीबीआयला त्यांचे काम करू दिले पाहिजे, त्यांना आम्हाला त्रास देण्याचा आदेश मिळाला आहे.''