ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून झालेल्या वादामुळे दिल्ली विद्यापीठाची बदनामी झाल्याची टीका दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्यासाठी त्यांना पत्र लिहून परवानगी घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र सिसोदिया यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु योगेश त्यागी यांना लिहिले होते. तसेच मोदींच्या पदवीची "संयुक्त तपास‘ पद्धतीने शहानिशा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
' पुढील आठवड्यात वेळ काढा, दिल्लीचा शिक्षणमंत्री या नात्याने मी तुमच्याकडे येईन. पंतप्रधानांच्या पदवीसंबंधित सर्व कागदपत्रे तुमच्या दालनात उपलब्ध करावीत. आपण त्याची तपासणी करू व त्यातून निघालेला निष्कर्ष आपण संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करू. तसेच ही संबंधित कागदपत्रे विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करू‘ असे सिसोदिया यांनी पत्रात म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए आणि एमएची पदवी जाहीर केली होती, मात्र या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष संपायला तयार नाही.या पदव्या बनावट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला असून दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बनावट मार्कशीट्सना अधिकृततेचा दर्जा दिल्याचेही त्यांनी म्हटले होते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीएची पदवी खरी असल्याबाबत दिल्ली विद्यापीठाने मंगऴवारी शिक्कामोर्तब केले. मोदींची पदवी खरी असून यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. पदवीमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्यानंतर सिसोदिया यांनी हे पत्र लिहून ती कागदपत्रे तपासण्याचे आवाहन केले आहे.