नवी दिल्ली : मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने २५ एप्रिल रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात हा दावा करण्यात आला आहे.
शनिवारी न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली. सिसोदिया यांना हजर करण्यासाठी न्यायालयाने तुरुंग प्राधिकरणाच्या नावे प्रॉडक्शन वॉरंट जारी केले. सिसोदिया यांच्याशिवाय सीए बुच्ची बाबू गोरंटला, मद्य विक्रेते अर्जुन पांडेय व अमनदीप ढल यांनाही समन्स पाठविण्यात आले आहे. या सर्व आरोपींना २ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पुरवणी आरोपपत्रात काय म्हटले आहे... सिसोदिया हे या घोटाळ्याच्या मुळाशी असलेल्या वादग्रस्त जीओएम अहवालाचे मुख्य शिल्पकार होते. वितरकांकडून लाभ मिळविण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. मद्य धोरणात खासगी घाऊक विक्रेत्यांना ५ ते १२ टक्के नफा दिला गेला होता.