Manish Sisodia Bungalow:दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा सरकारी बंगला आता आतिशी मार्लेना यांना देण्यात आला आहे. अटकेनंतर मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला होता. या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना यांचा दिल्ली मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
दिल्लीच्या नवीन शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना यांना सिसोदिया यांचा बंगला देण्यात आल्यानंतर भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते तजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट केले की, अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानंतर मनीष सिसोदिया यांच्या बंगल्यातून त्यांची नेम प्लेट हटवण्यात आली आहे. केजरीवाल यांनी 15 दिवसांत बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. 26 फेब्रुवारीपासून तुरुंगात असलेल्या सिसोदिया यांच्यापासून केजरीवाल यांनी अवघ्या 15 दिवसांत स्वत:ला पूर्णपणे दूर केले. आता त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.
अधिकारी काय म्हणाले ?सार्वजनिक बांधकाम विभागाने 14 मार्च रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, आतिशी यांना पत्र जारी केल्यापासून आठ दिवसांच्या आत मान्यता देण्यास सांगितले आहे. सिसोदिया हे मथुरा रोडवरील AB-17 बंगल्यात राहत होते, ज्यामध्ये पूर्वीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित राहत होत्या. 2015 मध्ये आप सरकार स्थापन झाल्यानंतर हा बंगला सिसोदिया यांना देण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. सिसोदिया यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे आतिशी यांना हा बंगला दिला जाणार आहे.
सिसोदिया यांच्या ईडीच्या कोठडीत वाढईडीने सिसोदिया यांच्या कोठडीत सात दिवस वाढ करण्याची विनंती केली होती. मात्र शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या ED कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. सिसोदिया 22 मार्चपर्यंत कोठडीतच राहतील.