Manish Sisodia On CBI: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया CBIच्या रडावर आहेत. त्यांनी आता दावा केलाय की, सीबीआय उद्या त्यांचे बँक लॉकर तपासण्यासाठी येणार आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, "उद्या सीबीआय आमचे बँक लॉकर पाहण्यासाठी येत आहे. 19 ऑगस्ट रोजी माझ्या घरी 14 तासांच्या छाप्यात काहीही सापडले नाही, लॉकरमध्येही काही सापडणार नाही. सीबीआयचे स्वागत आहे. तपासात मी आणि माझे कुटुंब पूर्ण सहकार्य करू."
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. सिसोदिया दिल्लीचे उत्पादन शुल्क विभाग हाताळतात. सुमारे 14 तास चाललेल्या या छाप्यात सीबीआयने मनीष सिसोदिया यांचा फोन आणि संगणक जप्त केला होता. याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात अनियमितता असल्याचा आरोप करणाऱ्या दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवालानंतर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गेल्या महिन्यात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नोव्हेंबरमध्ये आणलेल्या धोरणांतर्गत दारू दुकानाचे परवाने खासगी व्यापाऱ्यांना देण्यात आले. या दारू धोरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
'आप'ने केंद्र सरकारवर आरोप केलेया प्रकरणी 'आप'ने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मनीष सिसोदिया यांनी सरकारी दारूच्या दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे धोरण बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. सिसोदिया यांनी नुकताच असा दावा केला होता की, भाजपने पक्षात आल्यावर त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्याची आणि मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती. मात्र, भाजपने मनीष सिसोदिया यांचा दावा फेटाळून लावला असून त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.