नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बुधवारी आम आदमी पार्टीच्या (आप) अनेक नेत्यांनी भाजपवर मोठे आरोप केले आहेत. आम आदमी पार्टीच्या चार आमदारांनी भाजपवर आरोप केला की, त्यांना पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर दिली होती. तसेच, यावरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. "मला तोडण्यात अयशस्वी झाले, आता इतर आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20-20 कोटींची ऑफर देऊन, छाप्याची भीती दाखवून, त्यांना तोडण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. भाजपने काळजी घ्यावी, ते अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहेत, भगतसिंग यांचे अनुयायी आहेत. जीव देणार पण विश्वासघात करणार नाहीत. त्यांच्यासमोर तुमची ईडी-सीबीआयचा काही उपयोग नाही", असे मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे.
याचबरोबर, दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या आमदारांना भाजप नेत्यांकडून अप्रत्यक्ष धमक्या आल्या आहेत, जर त्यांनी भाजपकडून 20 कोटी रुपये घेतले नाहीत आणि 'आम आदमी पार्टी' सोडली नाही तर त्यांचेही दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून मनीष सिसोदिया यांच्यासारखे हाल होतील, असे भाजपकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी बुधवारी केला.
संजय सिंह म्हणाले की, 'महाराष्ट्रात शिंदे यांच्यावर ज्या मॉडेलने काम केले, तेच मॉडेल मनीष सिसोदिया यांच्यावर अपयशी ठरले, पण आता भाजप आमच्या आमदारांना टार्गेट करत आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमनाथ भारती यांच्यासह आम आदमी पार्टीचे चार आमदारही उपस्थित होते. यावेळी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सांगितले की, भाजप दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.