नवी दिल्ली: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारी दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आता थेट 20 मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. म्हणजेच, सिसोदिया यांची होळी तुरुंगातच साजरी होणार आहे. यापूर्वी 4 मार्च रोजी त्यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत रवानगीसिसोदिया यांचा मुक्काम आता तिहार तुरुंगात असणार आहे. सीबीआयने सिसोदियांना न्यायालयीन कोठडीवर पाठविण्याची मागणी केली. सीबीआयने कोर्टाला सांगितले की, आम्ही आणखी पोलिस कोठडीची मागणी करत नाही. परंतु भविष्यात याची मागणी केली जाऊ शकते, कारण आरोपी व्यक्तीचे आचरण योग्य नाही. साक्षीदारांना टार्गेट करण्याची भीती आहे.
राजकीय रंग देत सिसोदियासीबीआयने पुढे म्हटले की, ते साक्षीदारांना धमकावत आहेत आणि या कारवाईला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतरच आम्ही छापा टाकला होता. या प्रकरणात जी कोणती कारवाई झाली, ती न्यायालयाला माहितच आहे. सीबीआय बेकायदेशीर काम करत असल्याचे चित्र दाखवले जात आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
न्यायालयीन कोठडीदरम्यान, मनीष सिसोदियांना औषधे, डायरी, पेन आणि भगवत गीता ठेवण्याची परवानगी दिली जाईल. तुरुंगातील प्रशासनाने कोर्टाला सांगितले की, कैद्यांसाठी विपशानाची एक व्यवस्था आहे. दरम्यान, 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरण आणि अंमलबजावणीच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप मनीष सिसोदिया यांच्यावर आहे.