नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत. सीबीआयने ९ तास चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांनी बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं ते म्हणाले. भाजप तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल, तुम्ही आम आदमी पक्ष सोडा. अन्यथा तुम्हाला चौकशांना सामोरे जावे लागेल, त्रास सहन करावा लागेल, अशी धमकीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बाजुला नेऊन दिल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे नाव घेऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्धही खोटाच खटला आहे, तरीही ते तुरुंगात आहेत, असेही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. मात्र, सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या आरोपांचं खंडन करत सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, कायदेशीररित्या याप्रकरणाचा तपास सुरूच राहिल, असेही सीबीआयने म्हटले आहे.
दरम्यान, मनिष सिसोदिया यांनी यापूर्वीही भाजपावर मोठा आरोप केला होता. आम आदमी पक्ष फोडा आणि भाजपात या सर्व सीबीआय व ईडीच्या सर्व केस बंद करतो, अशी ऑफर भाजपकडून दिली गेली असल्याचं सिसोदिया यांनी म्हटलं होतं. "माझ्याकडे भाजपाकडून मेसेज आला आहे. 'आप' तोडून भाजपामध्ये या, सर्व CBI, ED च्या केस बंद करून टाकतो. माझं भाजपाला सांगू इच्छितो मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. शिर धडापासून वेगळं झालं तरी चालेल पण भ्रष्टाचारी आणि षडयंत्र रचणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्याविरोधातील सर्व गुन्हे खोटे आहेत. काय करायचं ते करा", असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं होतं.
दरम्यान, सीबीआयच्या चौकशीनंतर मनिष सिसोदिया २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. गुजरातमध्ये यावेळी आम आदमी पक्षाचं सरकार येईल, असा विश्वासही सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे.