आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमधील एका न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी कनिष्ठ न्यायालय, हायकोर्टा आणि सुप्रीम कोर्टाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. आता राउज एवेन्यू कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी राऊज एवेन्यू कोर्टामध्ये मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने सुरक्षित ठेवला होता. सिसोदिया हे घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सीबीआयने कोर्टात न्यायाधीशांसमोर केली होती. जामीन मिळाल्यास ते पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, असा दावा सीबीआयने केला होता. दरम्यान, कोर्टाने आज सिसोदिया यांचा जामीन फेटाळून लावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील (पटपरगंज) लोकांना एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी लिहिलं की, "लवकरच बाहेर भेटू. गेल्या एक वर्षात मला सर्वांची आठवण आली. आम्ही सर्वांनी मिळून अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. स्वातंत्र्याच्या वेळी जसे सर्वजण लढले, त्याचप्रमाणे आपण चांगल्या शिक्षणासाठी आणि शाळांसाठी लढत आहोत, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.