नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांच्या कार्यालयावर पुन्हा एकदा सीबीआयनं (CBI) छापेमारी सुरू केली आहे. स्वत सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. पण, या संदर्भात सीबीआयनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सिसोदियांवर कथित अबकारी धोरणातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
मनीष सिसोदिया यांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट केले की, 'आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या ऑफिसवर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावात जाऊन चौकशी केली. माझ्याविरुद्ध काहीही सापडलं नाही आणि सापडणार नाही, कारण मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही. दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे.'
दिल्लीचे उप-राज्यपाल विनय कुमार सक्सेना (VN Saxena) यांनी उत्पादन शुल्क धोरणातील कथित विसंगतींचा हवाला देत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. उत्पादन शुल्क खातं त्यावेळी त्यांच्या अखत्यारीत होतं. राजकीय नेत्यांना लाच देऊन खासगी कंपन्यांनी दारू दुकानाचे परवाने मिळविल्याचा आरोप आहे. मात्र, सिसोदिया यांच्यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सातत्यानं या आरोपांचं खंडन करत आहेत. तसेच, मनीष सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत आहेत.