नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे. यासाठी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भगतसिंग यांचे जन्मगाव आपल्या लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे एक खासदार या नात्याने ही मागणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मी आपणास करत आहे असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. भाजपा आणि रा. स्व. संघाने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवलेला असतानाच काँग्रेसने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी यांची मागणी मोदी सरकारने फेटाळल्यास राष्ट्रवादाच्या नावावर भाजपाच्या विरोधात काँग्रेसला मोठा मुद्दा मिळू शकतो.
23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे 23 वर्षांचे आणि राजगुरू 22 वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.
23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी ते सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा. आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. फासावर जाताना तिघंही 'मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात होते.