अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते. मात्र पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अखेरीस मणिशंकर अय्यर यांनी मोदींबाबत केलेले नीच प्रकारचा माणूस हे वक्तव्य आणि मोदींनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत काँग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या तथाकथित बैठकीची पुडी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून गेली. गुजरात विधानसभेतील सध्या येत असलेल्या कलांवरून भाजपाने स्पष्ट बहुमतासह सत्ता राखल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या 89 आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या 93 मतदारसंघांमधील निकालांमधून पहिल्या टप्प्यात काँग्रेसला तर दुसऱ्या टप्प्यात भाजपाला फायदा झाल्याचे स्पष्ट होत आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 89 जागांसाठी मतदान झाले होते. त्या मतदारसंघांमध्ये सध्या येच असलेल्या कलांनुसार भाजपाला 48 जागा तर काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यामधील मतदानात काँग्रेसला भाजपापेक्षा केवळ 7 जागा कमी मिळाल्या होत्या. दुसऱ्या टप्पात झालेल्या 93 मतदारसंघातील मतदानामध्ये मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य, पाकिस्तानचा मुद्दा यांचा लाभ भाजपाला झाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानात भाजपाला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 93 मतदारसंघांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसला केवळ 30 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. 182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे.
मणिशंकर, पाकिस्तानचा काँग्रेसला फटका! दुसऱ्या फेरीतील मतदानात भाजपाला झाला बंपर लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 1:44 PM