नवी दिल्ली : पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘२ जी दूरसंचार लायसन्सेसप्रकरणी सहकार्य केले नाही तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा खळबळजनक आरोप भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राई) माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी या पुस्तकात केला.बैजल हे स्वत: २ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातील आरोपी आहेत. या प्रकरणात अरुण शौरी व रतन टाटा यांना गोवण्यात यावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असेही बैजल यांनी स्वत: प्रकाशित केलेल्या आपल्या ‘द कम्प्लीट स्टोरी आॅफ इंडियन रिफॉर्म्स : २ जी, पॉवर अॅण्ड प्रायव्हेट एंटरप्रायज -ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ या पुस्तकात म्हटले. २००३ मध्ये तत्कालीन रालोआ सरकारने बैजल यांची ट्राईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, हे विशेष.बैजल म्हणतात, ‘संपुआचे दूरसंचारमंत्री राहिलेले दयानिधी मारन यांच्या कार्यकाळापासूनच २ जी घोटाळ्याची सुरुवात झाली होती. जर मी सहकार्य केले नाही तर माझे नुकसान होईल, अशी सीबीआयने मला प्रत्येक बाबतीत धमकी दिली. योगायोग असा की अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांनीही अशीच धमकी दिली होती, की जर मी २ जी प्रकरणी त्यांच्या योजनेप्रमाणे सहकार्य केले नाही तर मला परिणाम भोगावे लागतील.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)४माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारावर प्रकाश टाकणारे गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले हे तिसरे पुस्तक आहे. याआधी मनमोहनसिंग यांचे सहकारी व मीडिया सल्लागार राहिलेले संजय बारू आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख या दोघांनीही आपल्या पुस्तकात मनमोहनसिंग यांच्यावर आरोप केले होते.४या संदर्भात डॉ. सिंग यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. पत्रकारांशी बोलताना बैजल म्हणाले, ‘मी सर्व काही सांगितले आहे. जे सांगितले ते शंभर टक्के सत्य असून ते सिद्ध करण्यासाठी मजजवळ पुरावेही आहेत.’
मनमोहनसिंग म्हणाले होते, सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2015 11:56 PM