Punjab Assembly Elections 2022: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील जनतेला संबोधित करताना मोदी सरकारवर कोरोना महामारीपासून रोजगार, महागाई आणि देशाच्या अर्थ तसेच परराष्ट्र नितीवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र संबंधांच्या नितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आमंत्रण नसतानाही बिर्याणी खाऊन येणं किंवा राजकीय नेत्यांना मिठी मारल्यानं देशाचे परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, असा टोला लगावला आहे.
केंद्रातील मोदी सरकारला आर्थिक नियोजनांची अजिबात समज नाही. देशातील तर सोडून द्या पण केंद्राची परराष्ट्र निती देखील फोल ठरली आहे, असं डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. चीन भारताच्या सीमेवर दबा धरून बसलेला आहे आणि या मुद्द्याला दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी यावेळी केला. तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचीही आठवण करून दिली. "राजकारण्यांना मिठी मारुन किंवा आमंत्रण नसतानाही बिर्याणी खाऊन आल्यानं परराष्ट्र संबंध सुधारले जात नाहीत", असं डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
श्रीमंत आणि गरीबांमधील दरी वाढलीभाजपा सरकारच्या काळत श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. तर गरीब अजून गरीब होत आहे. भाजपा सरकारचा राष्ट्रवाद जितका पोकळ आहे तितकाच तो देशासाठी खूप घातक असल्याचं मनमोहन सिंग म्हणाले. भाजपा सरकारचा राष्ट्रवाद इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा याच नितीवर अवलंबून आहे, असंही ते म्हणाले. मोदी सरकारनं देशाच्या संविधानात्मक संस्थांचे वासे पोकळ करुन टाकले आहेत. तसंच सरकारची परराष्ट्र निती देखील सपशेल फोल ठरली आहे, असं मनमोहन सिंग म्हणाले.