Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:09 PM2018-11-21T16:09:15+5:302018-11-21T16:11:11+5:30
राफेल डीलवरुन मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका
इंदूर: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राफेल खरेदीचा व्यवहार संशयास्पद असल्यानं संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. मात्र यासाठी सरकार तयार नाही. यावरुनच या संपूर्ण व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसून येतं, अशा शब्दांमध्ये माजी पंतप्रधानांनी मोदींवर जोरदार टीका केली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग इंदूरला आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'देशवासीयांच्या मनात राफेल कराराबद्दल शंका आहेत. या कराराच्या चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे. मात्र मोदी सरकार यासाठी तयारी नाही. यावरुनच या व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं समजून येतं,' असं मनमोहन सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी रोजगाराच्या मुद्यावरुनही सरकारवर टीका केली. मोदी सरकार दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार होतं. या आश्वासनाचं काय झालं?, असा प्रश्न मनमोहन सिंग यांनी उपस्थित केला.
The people of the country are suspicious of the #Rafale deal, the opposition and various groups are demanding a joint parliamentary committee but Modi government isn’t ready for it. Isse pata lagta hai daal mai kuchh kaala hai: Former PM Manmohan Singh pic.twitter.com/f71OIEKl5y
— ANI (@ANI) November 21, 2018
मनमोहन सिंग यांच्या पत्रकार परिषदेआधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मनमोहन सिंग हे रिमोट कंट्रोलनं चालणारे पंतप्रधान होते, अशा शब्दांमध्ये विजयवर्गीय यांनी सिंग यांच्यावर तोंडसुख घेतलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रिमोटनं मनमोहन सिंग यांचं सरकार चालायचं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी कोळसा, 2जी सह विविध घोटाळ्यांचा दाखला देत मनमोहन सिंग केवळ मूठभर लोकांना फायदेशीर ठरणारे निर्णय घ्यायचे, असा आरोपदेखील विजयवर्गीय यांनी केला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशात एकूण 11 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं ते म्हणाले.