इंदूर: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राफेल खरेदीचा व्यवहार संशयास्पद असल्यानं संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. मात्र यासाठी सरकार तयार नाही. यावरुनच या संपूर्ण व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसून येतं, अशा शब्दांमध्ये माजी पंतप्रधानांनी मोदींवर जोरदार टीका केली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग इंदूरला आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'देशवासीयांच्या मनात राफेल कराराबद्दल शंका आहेत. या कराराच्या चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे. मात्र मोदी सरकार यासाठी तयारी नाही. यावरुनच या व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं समजून येतं,' असं मनमोहन सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी रोजगाराच्या मुद्यावरुनही सरकारवर टीका केली. मोदी सरकार दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार होतं. या आश्वासनाचं काय झालं?, असा प्रश्न मनमोहन सिंग यांनी उपस्थित केला.
Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 4:09 PM