मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 21:28 IST2024-12-29T21:26:27+5:302024-12-29T21:28:55+5:30
Manmohan Singh News: तुम्ही पंतप्रधान व्हाल असे मनमोहन सिंग यांना कोण म्हणाले होते? मनमोहन सिंगांनी काय दिले होते उत्तर?

मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी
Manmohan singh news marathi: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. २००४ मध्ये यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक होते, पण वर्णी लागली मनमोहन सिंग यांची! ते पंतप्रधान होतील, असे भाकित एका राजकीय रणनितीकाराने १९९७ मध्ये केले. विशेष म्हणजे ते मनमोहन सिंग यांनाच 'तुम्ही पंतप्रधान व्हाल', असं म्हणाले होते. ती भविष्यवाणी २००४ मध्ये खरी ठरली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राजकीय रणनितीकार आणि राजकीय अभ्यासक विमल सिंह यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर हा प्रसंग सांगितला.
मनमोहन सिंग म्हणालेले, 'मी अर्थशास्त्रज्ञ, नेता नाही'
"जानेवारी १९९७ मध्ये माझी मनमोहन सिंग यांच्यासोबत भेट झाली होती. एका साधारण घराच्या बागेत आम्ही फिरत होतो. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, एक दिवस तुम्ही भारताचे पंतप्रधान बनाल. मनमोहन सिंग यांना माझ्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही आणि ते नम्रपणे म्हणाले की, 'मी एक अर्थशास्त्रज्ञ आहे, राजकीय नेता नाही'. पण, ही भविष्यवाणी २००४ मध्ये खरी ठरली", असा किस्सा सिंह यांनी सांगितला.
बीबीसी लंडनच्या मुलाखतीबद्दलची एक आठवण सांगत त्यांनी सिंग यांच्या विनम्रतेबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे खूप विनम्र होते. १९ नोव्हेंबर १९९८ रोजी, मनमोहन सिंग यांनी बीबीसीला पहिली मुलाखत दिली. ते काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सहभागी होणार होते. मी त्यांना कॉल केला. त्यांनी लगेच तो घेतला आणि नम्रपणे सांगितले की, 'मी ती मुलाखत नंतर बघतो.', अशी आठवण विमल सिंह यांनी सांगितली.
मनमोहन सिंग कसे बनले पंतप्रधान?
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला २००४ मध्ये एनडीएला बहुमत मिळालं नाही. यूपीएला बहुमत मिळालं. सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आणि त्यांना विरोध सुरू झाला.
त्यामुळे यूपीए आघाडीतून कोणाला पंतप्रधान पदाची संधी मिळणार, याबद्दल चर्चा सुरू होत्या. सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली. २००४ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यानंतर २००९ मध्येही त्यांचीच निवड करण्यात आली. सलग दहा वर्षे ते पंतप्रधान राहिले.